फुलंब्री शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
फुलंब्री शहरासह परिसरात मंगळवारी रात्री एक ते तीन वाजेदरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी अक्षरक्षः धुमाकूळ घालत एका बंद घराचे कुलूप तोडून ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने पळविले.फुलंब्री येथील वरची वेस राम मंदिराजवळील सुरेश बळी यांच्या घरात भाड्याने राहणारे शेजवळ कुटुंब घरी नसल्याची संधी साधून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी रात्री अडीचच्या सुमारास कटरच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात जाण्यापूर्वी सांडू भिवसने यांच्या घराच्या गेटचा आवाज झाल्याने भिवसने जागे झाले. चोर शेजवळ यांच्या घरात घुसल्याची माहिती शेजारील हापत यांना मोबाइलवरून दिली. हापत यांनी पोलिस निरीक्षक संजय सहाने यांना माहिती कळविली. परंतु, तोपर्यंत चोरट्यांना संशय आल्याने त्यांनी सोन्या चांदीचा ऐवज घेऊन धूम ठोकली.घटनेच्या एक तासानंतर परत चोरटे साडेतीनच्या सुमारास त्याच ठिकाणी आले. यावेळी सांडू भिवसने यांनी हेच चोर असल्याचे सांगताच नागरिकांनी चोराकडे धाव घेताच त्यांनी म्हसला रोडच्या दिशेने दुचाकी पळवली. म्हसला गावात बंद असलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असताना शेजारील नाईक यांच्या आवाजाने ते घराबाहेर आले व चोरांना काय करत आहे असे विचारले असता तंबाखू लागत असल्याचे सांगत गावाच्या दिशेने पलायन केले. परंतु, त्यांना पुढे रास्ता न दिसल्याने ते परत माघारी फिरले. यावेळी नाईक यांनी मदतीसाठी नातेवाईकांना दांडे घेऊन बोलावले असता चोर पळण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लिप होऊन पडले. तिथेच दुचाकी सोडून पळताना नालीत पडले. त्यामुळे त्यांच्या हातात असलेले चोरी करण्याची कटर व दोन रॉड तेथे पडले. परंतु, चोरांनी पोबारा केला. नंतर या चोरांनी खटे वस्तीवरील संदीप देवमाळी यांची दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती चालू न झाल्याने तेथेच बाजूला असणाऱ्या रमेश खटे यांची दुचाकी लोटत नेण्याचा प्रयत्न केले. परंतु, खटे यांच्या आईला जाग आल्याने चोर दुचाकी सोडून शेतातून पळून गेले.या घटनेनंतर पोलिसांनी कसून चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरटे पसार झाले.चोरीसाठी वापरलेली दुचाकी व रॉड व मोठी कैची पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांनी घटनेच्या ठिकाणी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ज्या ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणी भेटी दिल्या व गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. नीलेश शेजवळ यांनी फुलंब्री ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस तपास करित आहेत.