फुलंब्री टी पॉइंटवर पोलीस मदत केंद्र सुरू
औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वाहनांची वर्दळ आणि नागरिकांचा बेशिस्तपणा यामुळे फुलंब्री शहरात दररोज वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना, वाहनचालकांना प्रचंड मनःस्ताप होतो, भांडणे होतात. अशावेळी पोलिसांची तात्काळ मदत मिळावी याकरीता येथील टी पॉईंटवर पोलीस मदत केंद्रसुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१९) करण्यात आले.
यावेळी डॉ. विनय राठोड म्हणाले की, फुलंब्री येथील पोलीस ठाण्याचे शहराबाहेर स्थलांतरीत झाल्यानंतर कायम गजबजलेल्या टी पॉईंटवर पोलीस मदत केंद्र उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. राष्ट्रीय महामार्ग तसेच अजिंठा-वेरूळ लेणीला जाणारे पर्यटक प्रवाशी व वाहनधारकांची कायम गर्दी असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. वाहन उभे करण्यावरुन छोटे-मोठे वाद निर्माण होतात. वाहतूक कोंडी सोडण्यासाठी, भांडणे मिटविण्यासाठी या ठिकाणी पोलीस मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी कायम पोलीस कर्मचारी कार्यान्वित राहणार असल्याचेही ते म्हणाले.या पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा अबुज, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे व शहरातील नागरिक उपस्थित होते