जालन्यातील अग्निशमन दलाच्या इमारतीचे छत कोसळले
एक कर्मचारी जखमी तर चार फायर बुलेटचे झाले नुकसान
जालन्यातील अग्निशमन दलाच्या निजामकालीन इमारतीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक कर्मचारी जखमी झाला आहे त्याचबरोबर नुकतेच लोकार्पण झालेल्या चार फायर बुलेटचं नुकसान झाले आहे. जालन्यातील अग्निशमन दलाची ही इमारत निजामकालीन होती. ती पूर्ण जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे महापालिकेनं बाजूला नवीन इमारतीचं काम सुरु केलं असून ते पूर्णही झाले आहे. पुढच्या काही दिवसात अग्निशमन दल नवीन इमारतीत शिफ्ट होणार होते मात्र त्याआधीच जुन्या इमारतीचे छत कोसळले आहे.
दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झाली नसून एका कर्मचाऱ्याच्या पायाला मार लागल्याने तो जखमी झाला आहे तर चार नवीन फायर बुलेटचे नुकसान झालं आहे अशी माहिती जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. या घटनेत सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही याबद्दल देवाचे आभार मानतो आणि काही दिवसांत नवीन अग्निशमन दलाचे कार्यालय लवकरच दिसेल अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.