आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात ज्ञानराधा बँकेतील ठेवादारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
1 लाख 63 हजार जणांचे फिक्स डिपॉजिटचे खाते असून त्यामध्ये 1700 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे
जालन्यात ज्ञानराधा बँकेत ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत द्यावे या मागणीसाठी आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. ज्ञानराधा बँकच्या संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात सर्वाधिक शाखा आहेत. त्यामध्ये 1 लाख 63 हजार जणांचे फिक्स डिपॉजिटचे खाते असून त्यामध्ये 1700 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. सेविंग आणि करंट खात्यानुसार आतापर्यंत तीन लाखांहून अधिक खातेदार समोर आले आहेत. 3 हजार 750 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, मात्र संचालक आणि व्यवस्थापक यांनी या पैशांचा गैरवापर करून वेगवेगळ्या ठिकाणी पैसा वापरला आहे आणि त्यामुळे आज लाखो लोकांचे पैसे यामध्ये बुडाले आहेत. त्यामुळे हे पैसे परत मिळावे यासाठी ठेविदारांचा आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठेवीदारांनी वेगवेगळ्या नियोजनासाठी पैसे गुंतवले होते मात्र अद्यापही हे पैसै मिळालेले नाहीत, केंद्राची संस्था म्हणून लोकं मोठ्या विश्वासाने पैसे ज्ञानराधा सारख्या बॅंकेमध्ये ठेवतात मात्र त्याचे पैसे तिथे अडकवण्यात आले आहेत. जर राज्य व केंद्र सरकार संवेदनशील असेल तर आठ दिवसांच्या आत प्रशासक नेमावा तरच सरकारला खऱ्या अर्थाने मायबाप सरकार म्हणता येईल अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार राजेश टोपे यांनी दिली आहे.