Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज अखेर घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार यात काही शंका नाही.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.66 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.